International Yoga Day : आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले…
'मला काश्मीरमध्ये येण्याचे सौभाग्य मिळाले आहे. योगातून जी शक्ती मिळते, ती मी श्रीनगरमध्ये अनुभवत आहे. मी काश्मीरच्या भूमीतून योग दिनानिमित्त देशातील सर्व लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यात योग करणाऱ्यांचे अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 10 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण झाला आहे.'
देशात आणि जगात दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वत्र उत्साह आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये एका विशेष योग कार्यक्रमात सहभाग घेतला. गेल्या दहा वर्षांत योगाच्या विस्तारामुळे सर्व जुन्या धारणा बदलल्या असल्याचे म्हणत योग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले, मला काश्मीरमध्ये येण्याचे सौभाग्य मिळाले आहे. योगातून जी शक्ती मिळते, ती मी श्रीनगरमध्ये अनुभवत आहे. मी काश्मीरच्या भूमीतून योग दिनानिमित्त देशातील सर्व लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यात योग करणाऱ्यांचे अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 10 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण झाला आहे. पुढे ते असेही म्हणाले, आता मी जगात कुठेही जातो, जागतिक नेते आता योगाबद्दल बोलतात. ज्याला संधी मिळेल तो योगाची चर्चा करू लागतो. जगभरातून लोक खरा योग शिकण्यासाठी भारतात येतात. आज जगभरात योगा करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. योगाकडे लोकांचे आकर्षण वाढले आहे. योग आता सतत नवनवीन विक्रम करत असल्याचेही त्यांनी म्हटले.