विधानसभेच्या तोंडावर पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर रोख रक्कम घेऊन जाणारे खासगी वाहन राजगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरून एका खासगी वाहनातून 5 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान ही रक्कम कोणाची? कुठे चालवली होती? आदीबाबत राजगड पोलिसांकडून पडताळणी सुरु असताना ही रक्कम सांगोल्यातील एका राजकीय नेत्याची असल्याची चर्चा होत होती. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील एक ट्वीट केले होते. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर पकडण्यात आलेली पाच कोटींची रक्कम पोलीस स्टेशनंमधून ट्रेझरीमध्ये नेण्यात आली आहे. संध्याकाळी 7 वाजता एका खासगी वाहनातून नाकाबंदी करून ही रक्कम पकडण्यात आली होती. त्यांनंतर याची मोजणी करून पहाटे 4 वाजता ही रक्कम पुण्यातील ट्रेझरी येथे पाठवण्यात आली. या दरम्यान या खासगी वाहनातील 4 जणांचीही चौकशी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांसह अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ सुरू असून एकाही अधिकाऱ्यानी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तर राजकीय दबावापोटी हे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतायत का? पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करताय का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे.