Maharashtra Corona Case | महाराष्ट्रात आज कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 8 हजार 67 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 766 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच कोरोनामुळे (Corona) मुंबईकरांची झोप उडण्याची शक्यता आहे. कारण, आज मुंबईत (Mumbai) तब्बल 5 हजार 428 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आता 16 हजार 441 वर पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब ही की आज ओमिक्रॉनची (Omicron) लागण झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही, तशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 8 हजार 67 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 766 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 66 लाख 78 हजार 821 इतकी झाली आहे. राज्यात सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 24 हजार 509 वर पोहोचली आहे. तर 1 लाख 75 हजार 592 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 79 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.