किराडपुराचे जीवन पूर्वपदावर मात्र संभाजीनगरमधील राड्यात एकाचा मृत्यू, 14 पोलीस जखमी
VIDEO | संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या राडा प्रकरणी एकाचा मृत्यू, 300 ते 400 अज्ञातांवर गुन्हे तर आतापर्यंत सात जणांना अटक
संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन गटातील राड्यात एकजण जखमी झाला होता. या व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती 51 वर्षाची होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्या वक्तीचा मृत्यू झाला. या राड्यात 14 पोलीसही जखमी झाले आहेत. दरम्यान, किराडपुरा येथे तणावपूर्ण शांतता असून काही दुकाने उघडली आहेत. वाहतूकही काही प्रमाणात सुरू झाली आहे. किराडपुरा भागात परवा रात्री साडेबारा वाजता दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी दोन्ही गटाकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली होती. तसेच अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. यात पोलिसांच्या 12 गाड्या जाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. रमजानचे दिवस सुरू आहेत. शिवाय काल रामनवमी असतानाच हा राडा झाल्याने पोलिसांनी या भागात मोठा बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, पोलिसांनी या हल्ल्यानंतर तात्काळ सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 20 जणांची ओळख पटली आहे. त्यापैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे.