Abdul Sattar | मी महिलांचा अपमान केला नाही, सुप्रिया सुळेंसाठी ‘ते’ शब्द वापरल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी फेटाळला
महिलांबद्दल एक शब्दही मी बोललो नाही. बोलणार नाही. मी महिलांचा सन्मान करणारा आहे, असं स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिलंय.
औरंगाबादः घराच्या काचा फोडल्या. मी केलेल्या वक्तव्यावरून माफी मागतो. माझे शब्द परत घेतो, असं वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलंय. मात्र सत्तार यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण खूपच तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. मुंबईत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शासकीय बंगल्याची प्रचंड तोडफोड राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Activists) कार्यकर्त्यांकडून करण्यात येतेय. महिला आघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरावर दगडफेक केली.
औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेना शिवीगाळ केली. यावरून राज्यभर संताप व्यक्त केला जातोय.
सत्तार यांनी आरोप फेटाळले पाहा काय म्हणाले?
अब्दुल सत्तार यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ मी कोणत्याही महिलेबद्दल अपशब्द बोललो नाही. जे लोक आम्हाला बदनाम करू लागले, त्यांच्याबद्दल मी बोलू लागलो. मला एकाही महिलेचा मन दुखणार नाही, त्यांच्याबद्दल मी असं बोलणार नाही. एखाद्या महिला भगिनीला वाटत असेल, त्यांच्याबद्दल मी बोललो असेल तर मी जरूर खेद व्यक्त करेन. पण मी असं बोललेलो नाही. आताही तेच म्हणतोय. खोक्याबद्दल बोलत असताना मी ते वक्तव्य केलं. पण त्याचा अर्थ वेगळा काढला गेलाय…
महिलांबद्दल एक शब्दही मी बोललो नाही. बोलणार नाही. मी महिलांचा सन्मान करणारा आहे, असं स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीदेखील सत्तार यांना इशारा दिला आहे. सत्तेत महत्त्वाच्या पदावर आहात तरी विकृतासारखे अपशब्द वापरत आहात, महिलांना शिवीगाळ करणाऱ्या नालायक मंत्र्यांचा जाहीर निषेध आहे, असं रुपाली पाटील चाकणकर म्हणाल्या. अब्दुल सत्तार यांनी 24 तासाच्या आत माफी नाही मागितली तर दिसेल तिथे झोडपून काढू, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी केलंय. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होतच आहे. हा वैयक्तिक सुप्रिया सुळेंचा अपमान नाही. हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे. परवा गुलाबराव पाटील हे सुषमा अंधारे यांच्याबद्दलच बोलले आहेत. हे मंत्री आहेत का कोण? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे.