रणछोडदास घाबरून पळाले… आदित्य ठाकरेंवर शिंदे गटाची तुफ्फान टीका
लक्षात ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजूने सर्व शिवसैनिक आहेत. सभेला कुणी येणार नाही, म्हणून घाबरून तुम्ही रणछोडदास झाले आहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.
औरंगाबादः कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड मतदार संघात आदित्य ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आल्याचं कळतंय. त्याच दिवळी सिल्लोड येथेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचीही सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) सभा होतेय की नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे रणछोडदास मैदान सोडून पळून गेले, अशी टीका शिंदे गटातर्फे करण्यात येतेय. कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी ही टीका केली आहे.
येत्या 7 नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे यांची सिल्लोड मतदार संघात सभा आयोजित करण्यात आली होती. यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही नवे चेहरे समोर आले होते. आदित्य ठाकरे आणि दुसरे डॉ. श्रीकांत शिंदे. दोघांचा माझ्या ग्राऊंडवर मॅच होता.
तो आता कुठे रद्द होतोय का माहिती नाही. की ते रणछोडदास होतात माहिती नाही. पण माझी इच्छा आहे, दोघांच्याही सभा व्हाव्यात. त्या दृष्टीने आमची पूर्ण तयारी आहे. ज्या ठिकाणी त्यांना कमी पडत असेल तेही करून देतो. पण एखाद्या माणसाला बदनाम करण्यासाठी सभेला परवानगी नाकारली असे म्हणून दुसऱ्याला बदनाम करू नये, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलंय.
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनीही टीका केली. ते म्हणाले, रणछोडदास यांनी सिल्लोडची सभा रद्द केली. मुख्यमंत्र्याला चॅलेंज देता आणि एका खासदाराला घाबरून सभा रद्द करता. त्यामुळे तुम्ही आपली योग्यता तपासली पाहिजे. लक्षात ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजूने सर्व शिवसैनिक आहेत. सभेला कुणी येणार नाही, म्हणून घाबरून तुम्ही रणछोडदास झाले आहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.