‘वेड’मधील हे नवं गाणं खरोखरंच वेड लावेल, रितेश याने सांगितले सिनेमातील नवे बदल
वेड चित्रपटाला मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर काही बदल करण्यात आल्याचे अभिनेता रितेश देशमुखने व्हिडिओ शेअर करून कळवले आहे. कोणते झाले चित्रपटात बदल? काय म्हणाला रितेश देशमुख?
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलियाचा वेड हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी वेड ला डोक्यावर घेतले आणि हाऊसफुल प्रतिसाद दिला. वेड या चित्रपटाने नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाचा देखील विक्रम मोडला. मात्र या चित्रपटाला मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर काही बदल करण्यात आल्याचे अभिनेता रितेश देशमुखने व्हिडिओ शेअर करून कळवले आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून रितेश देशमुख याने प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रेम आणि प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले. सत्या आणि श्रावणी या दोघांच्या रोमँटिक गाण्याची प्रेक्षकांकडून सातत्याने मागणी होत होती, या मागणीनंतर वेड तुझं हे गाणं प्रेक्षकांना आता थिएटरमध्ये चित्रपटात पाहता येणार आहे, हा बदल रितेशने प्रेक्षकांना आवर्जून सांगितला. वेड या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाशिवाय जिया शंकर, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी, विक्रम गायकवाड, खुशी हजारे आणि विनीत शर्मा यांच्याही भूमिका आहेत.