‘छावा’च्या प्रदर्शनापूर्वी रश्मिका मंदाना अन् विकी कौशल साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?
‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटात अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या, रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई भोसलेंच्या तर अभिनेता अक्षय खन्ना हा औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टीझरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
बहुप्रतिक्षीत आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच चित्रपटातील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल शिर्डीच्या साई दरबारी पोहोचल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदाच अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल साईंच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी या दोघांनी चित्रपटाच्या यशासाठी साईबाबांना साकडे घातले. रश्मिकाच्या पायाला इजा झाली असताना विकी कौशल सोबत शिर्डी साईमंदिरात पोहोचली होती. दरम्यान, रश्मिका मंदानाच्या पायाला दुखापत असल्याने विकी कौशलचा सहारा तिने घेतला होता. साईच्या मध्यान्ह आरतीनंतर दोघे ही साईमंदिरात दाखल होत त्यांनी मनोभावे साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही दोघेही पहिल्यांदाच साई दरबारी आलोय. जीवनात कुठलही शुभ कार्य करण्याअगोदर आशीर्वाद घ्यावे लागतात. त्यामुळे आम्ही साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीला आलोय. सर्वांना आनंदी ठेवा आणि सर्वांचं भविष्य उज्वल करा हीच प्रार्थना साईबाबांच्या चरणी केली, अशी प्रतिक्रिया अभिनेता विकी कौशल यांनी दिली. तर साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही शिर्डीला आलोय. साईबाबांचे दर्शन घेऊन खूप छान वाटलं, अभिनेत्री रश्मिका मंदना हिने मराठीतून प्रतिक्रिया दिली.