“कोव्हिडचे नवनवीन व्हेरिएंट तपासणीसाठी मुंबईत मशीन”, Suresh Kankani यांची माहिती
सद्यस्थितीत डोके वर काढणारा ‘डेल्टा प्लस’ सर्वाधिक वेगाने पसरण्याचा धोका असल्यानेच पालिकेने ‘डेल्टा प्लस’सारख्या विषाणूंच्या चाचण्या कस्तुरबात करण्याचा निर्णय घेतल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मुंबई : कोवीडचे नवनवीन व्हेरिएंट तपासणीसाठी आता नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठवण्याची गरज नाही. अमेरिकेहून साडेसहा कोटींचे अत्याधुनिक जिनोम सिक्वेन्सिंग मशिन आणले गेले आहे. कस्तुरबा रुग्णालयातच कोरोनाचे जिनोम सिक्वेन्सिंग सुरू होणार असून यामुळं दोन तीन दिवसांत ‘डेल्टा प्लस’ चाचणी अहवाल मिळणार आहे. कोरोनाचे वारंवार बदलत असलेले घातक स्वरूप जाणून घेण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करणे गरजेचे असते. पुण्याला चाचणीसाठी नमुने पाठवल्यानंतर रिपोर्टसाठी लागणारे तब्बल दोन महिन्यांचे ‘वेटिंग’ संपणार आहे. डेल्टा प्लस’ संशयित सुमारे 600 अहवालांचे रिपोर्ट पालिकेला मिळाले आहेत. मुंबईत ‘डेल्टा प्लस’चा केवळ एकच रुग्ण आढळला असून तो बरा देखील झाला आहे. मात्र पालिका आगामी काळात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणूंची चाचण्या करण्यासाठी यंत्रणा उभारत आहे. सद्यस्थितीत पालिका ‘डेल्टा प्लस’सारख्या वेगळ्या विषाणूंच्या ‘जिनोम सिक्वेन्स’साठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी’कडे संशयित रुग्णांची सॅम्पल पाठवली जातात. मात्र सद्यस्थितीत डोके वर काढणारा ‘डेल्टा प्लस’ सर्वाधिक वेगाने पसरण्याचा धोका असल्यानेच पालिकेने ‘डेल्टा प्लस’सारख्या विषाणूंच्या चाचण्या कस्तुरबात करण्याचा निर्णय घेतल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.