‘रात्री 3 वाजेपर्यंत काम करता, मग आता झोपलात का?’, सरोदेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणतीही घटना घडली की स्वतः व्हिडिओ कॉल करतात. मग आता मु्ख्यमंत्री कुठे आहेत झोपलेत का? असा सवाल वकील आसीम सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
शुक्रवारी पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद येथील MPSC च्या विद्यार्थ्यांनी राज्यव्यापी आंदोलन केले होते. MPSC राज्य सेवा परिक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२३ पासून लागू न करता २०२५ पासून लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांची दखल घेतली नसल्याची टीका वकील असीम सरोदे यांनी केली.
‘जेव्हा लोकं रस्त्यावर उतरून मागण्या करतात, तेव्हा सरकारने त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यावर त्वरीत प्रतिसाद देणं अपेक्षित आहे. तसेच सध्या तरूणाचं राज्य असून सर्वाधिक तरूण मतदार आहेत आणि त्यांच्याच प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असेल तर त्यांना हे कळालं नसेल का?’ असे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
ते असेही म्हणाले की, ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणतीही घटना घडली की स्वतः व्हिडिओ कॉल करतात. करा आता व्हिडिओ कॉल एमपीएससीचे विद्यार्थी आता त्यांच्याशी बोलायला तयार आहेत. रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारे मुख्यमंत्री शिंदे आता मु्ख्यमंत्री कुठे आहेत झोपलेत का?’ असा सवाल एकनाथ शिंदेंना असीम सरोदे यांनी उपस्थित केला आहे.