पावसाचा सांगावा घेत आफ्रिकन पाहुणा आला कृष्णाकाठावर, किती महिने राहणार मुक्काम?
VIDEO | आफ्रिकन पाहुणा पलूसच्या कृष्णाकाठावर, शेतकऱ्यांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
सांगली : आभाळाकडे डोळे लाऊन बसलेल्या शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची वर्दी निसर्गातील पक्षांकडून मिळत असते. कुळीव कुळीव म्हणणारी कोकीळा, शेतकऱ्यांना पेरते व्हा अशी साद घालणारा पावशा, हे नेहमीच बळीराजाला पावसाच्या आगमनासाठी सज्ज ठेवत असतात. त्याचबरोबर आणखी एक पाहूणा उशीरा का होईना आज थेट आफ्रिकेतून पावसाचा सांगावा घेऊन पलूस च्या कृष्णाकाठावर दाखल झाला आहे. हा पाहूणा म्हणजे चातक. काळ्या पांढऱ्या चातकाच्या डोक्यावर एखाद्या राजकुमाराच्या डोक्यावर शोभावा असा काळा तुरा असतो. त्याचा साळुंकी एवढा आकार, लांब शेपूट, शरीराचा वरील सर्व भाग काळ्या रंगाचा असतो. हनुवटी, मान व पोटाचा भाग पांढरा असतो. पंखांवर रुंद पांढरा पट्टा असल्यामुळे उडतानाही हा चातक पक्षी सहज ओळखतो. हा चातक पक्षी आफ्रिकेतून पावसाचा सांगावा घेऊन पलुसच्या कृष्णकाठावर आल्याने बळीराजाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता कृष्णकाठावर पर्यटकांना सुरांची रानमैल अनुभवता येणार आहे. पावसाळ्याचे चार महिने चातक पक्षी कृष्णकाठावर मुक्काम ठोकून राहणार आहे.