काँग्रेसतर्फे अंबरनाथमध्ये केंद्र सरकारविरोधात निदर्शनं, काय केला आरोप?
VIDEO | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर अंबरनाथमध्ये काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन
ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर अंबरनाथमध्ये काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात निदर्शनं केली. अंबरनाथमधील काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावताच लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून थेट लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न जाणून घेतले, त्यामुळे राहुल गांधींची लोकप्रियता वाढून भविष्यात ते पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आपल्या विरोधात उभे राहतील, याची भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असल्याचा आरोप काँग्रेसने केला. याच भीतीतून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करत केंद्र सरकारने दडपशाही केली असून काँग्रेस या दडपशाहीला भिक घालणार नाही, तसंच आम्ही सदैव राहुल गांधी यांच्या पाठीशी आहोत, असं काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी म्हटले.