शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्येही भूकंप! अशोक चव्हाण यांचा रामराम, 15 ते 16 आमदार पक्ष सोडणार?
शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्येही मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्ह असल्याचे म्हटले जात आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर चव्हाण यांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजुकरांनीही काँग्रेस पक्ष सोडला आहे.
मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा, ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला असताना आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्येही मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्ह असल्याचे म्हटले जात आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर चव्हाण यांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजुकरांनीही काँग्रेस पक्ष सोडला आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्याच दिवशी अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होण्याची सूत्रांची माहिती आहे. अमित शाह यांच्या १५ फेब्रुवारीच्या संभाजीनगरच्या सभेत प्रवेशाची शक्यता आहे. दरम्यान, ६ ते ७ आमदार चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. तर एकूण १५ ते १६ आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.