Ladki Bahin Yojana : निकषवाली लाडकी बहीण, निवडणुका झाल्या मतं मिळाली आता ‘लाडकी बहीण’ निकषांच्या कात्रीत सापडणार
लाडक्या बहिणींच्या अर्जाबद्दल जर स्थानिक प्रशासनाकडून तक्रारी आल्या तर त्या अर्जाची छाननी होईल, अशी माहिती महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मात्र स्थानिक प्रशासन म्हणजे कोण? ते सरकारहून वेगळे आहेत का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
निवडणुका झाल्यानंतर आता लाडकी बहीण निकषांच्या कात्रीत सापडणार आहे. पण हे निकष सरसकट नसून फक्त तक्रारींच्याच आधारे लावले जातील अशी मलमपट्टी सुद्धा सरकारकडून करण्यात आली आहे. तक्रारी कशा स्वरूपात प्राप्त झाल्या याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी अतिशय रंजक माहिती दिली. तटकरे यांच्या मते योजनेचा लाभ घेतल्यानंतर नोकरी मिळाली म्हणून त्यांनी स्वतःहून लाडक्या बहिणीचे पैसे नकोत म्हणून अर्ज केलाय. म्हणजे आचारसंहितेच्या पुढच्या चार ते पाच महिन्यात किती लाडक्या बहिणींना नोकऱ्या मिळाल्या त्यांची संख्या नेमकी किती हा संशोधनाचा विषय आहे. दुसरा दावा सरकार करत आहे की, काही महिलांना नोकरीत प्रमोशन मिळाले म्हणून त्यांनी स्वतः लाडकी बहिणी योजनेचे पैसे नकोत म्हणून अर्ज केला आहे. तर काही लाडक्या बहिणींचे लग्न होऊन त्या परराज्यात स्थायिक झाल्यामुळे त्यांनी पैसे नकोत म्हणून अर्ज केल्याचाही दावा केला जातो. मात्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे आणि सरकारकडे किती तक्रारी प्राप्त झाल्या याचे उत्तर काही नाहीये. किती जणांनी पात्र नसताना पैसे उचलले याचेही आकडे सरकारकडे नाहीत. गंमत म्हणजे सरकार एकाही अर्जाची सरसकट फेर तपासणी करणार नाही. मात्र स्थानिक प्रशासनाकडून ज्या तक्रारी येताहेत त्यानुसार चौकशी होईल असं उत्तर तटकरे यांनी दिले. आता स्थानिक प्रशासन आणि सरकार हे दोन्ही वेगवेगळे घटक कसे याचे उत्तर अजून मिळालेलं नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट