शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीवर अजित पवार यांचं मिश्कील भाष्य, ‘मला तर मागचा अनुभव…’
बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल मोठे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, '१४ निवडणुका लढल्या तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही, मी सत्तेमध्ये नाही. राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष आहे. दीड वर्षांनंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल.'
महायुती आणि मविआच्या बड्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका सुरू असताना दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत देण्यात आले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, ‘मी असं ऐकंल… शरद पवार म्हणाले दीड वर्षांनंतर मी उभं राहणार नाही. त्यानंतर माध्यमांनी शरद पवार हे संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिलेत, अशा बातम्या चालवल्यात. जर शरद पवार संसदीय राजकारणातून निवृत्त जरी झाले तरी त्यांच्यानंतर त्यांचा पक्ष दुसरा कोणीतरी चालवणारच’, असं म्हणत शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर खरंच शरद पवार संसदीय राजकारणातून निवृत्ती घेतील असं वाटतं का? असा सवाल अजित पवारांना माध्यमांच्या प्रतिनिधीने केल्यानंतर अजित पवारांनी मिश्किलपणे भाष्य करत मला मागचा अनुभव आहे, असं वक्तव्य केले. तर शरद पवारांच्या निवृत्तीबाबत माहिती नाही, माझा अनुभव वेगळा असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.