प्रभू श्रीरामाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन ठाण्यात राडा, शरद पवार-अजित पवार गट पहिल्यांदाच भिडले
जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामांबद्दलच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांसमोर भिडले आहेत. आव्हाडांच्या या वक्तव्यनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज ठाण्यात थेट जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने केले
ठाणे, ३ जानेवारी २०२४ : राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामांबद्दलच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांसमोर भिडले आहेत. आव्हाडांच्या या वक्तव्यनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज ठाण्यात थेट जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने केले. जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर अजित पवार गट रामाची आरती करून आव्हाडांचा निषेध नोंदणीसाठी आले होते. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या बाहेर रामाची आरती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वर्तक नगर पोलिसांनी ठाणे शहर युवक अध्यक्ष वीरेंद्र वाघमारेंसह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.