दादांच्या राष्ट्रवादीत वसंत मोरे प्रवेश करणार? रूपाली पाटील यांनी राजीनाम्यावर बोलताना दिली ऑफर
पुण्यातील राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली पाटील यांनी वसंत मोरे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, वसंत मोरे यांनी आज योग्य निर्णय घेतला आहे. लोकहितासाठी कामं करणारा नेता वसंत मोरे यांना काम करताना पक्षात कुचंबणा...
पुणे, १२ मार्च २०२४ : मनसेचे पुण्यातील बडे नेते वसंत मोरे यांनी आज मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वसंत मोरे यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट टाकून सर्व खदखद व्यक्त केली. यानंतर यांनी पत्रकारपरिषद घेत राजीनाम्यावर सविस्तर भाष्य केले. दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली पाटील यांनी वसंत मोरे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, वसंत मोरे यांनी आज योग्य निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांचे मी अभिनंदन करते. लोकहितासाठी कामं करणारा नेता वसंत मोरे यांना काम करताना पक्षात कुचंबणा होत होती. वसंत मोरे यांनी घेतलेल्या राजीनाम्याच्या या निर्णयाला उशीरच झाला. त्यांनी अनेक वर्ष अशा गोष्टी सहन केल्यात. लोकांची पसंत मोरे वसंत…मनसेला नव्हती पसंत… म्हणून त्यांनी दिलेला मनसेचा राजीनामा हा योग्य आहे, असे रूपाली पाटील यांनी म्हटले आहे. इतकंच नाहीतर वसंत मोरे यांचं अजित पवार गटात स्वागत आहे, असं म्हणत अजित पवार गटात येण्याचं रुपाली पाटील यांनी आवाहन करत राष्ट्रवादीत तुमचं स्वागत असणार असे म्हणत रूपाली पाटील यांनी वसंत मोरे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत येण्याची ऑफरच दिली आहे.