विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, राँग साईडने वाहनं चालवणाऱ्यांना दिले वाहतूकीचे धडे
अकोला शहरात अगदी बेशिस्त आणि अकोला वाहतूक पोलिसांच्या कामकाजावर सवाल उपस्थित करीत आमदार मिटकरी चक्क रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान प्रत्येकाला समोर जाण्याची घाई आणि त्यातही वाहतूक नियमांचा पडलेला विसर वाहनधारकांमध्ये दिसून आलंय.
विरोधकांना धारेवर धरणारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे ट्राफिक पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. आमदार अमोल मिटकरी आज दुपारी कडक उन्हात अशोक वाटीका आणि नेहरू पार्क रस्त्यावर उतरले आणि तेच ट्रॅफीक पोलीस बनल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी उड्डाणं पुलासह इतर मार्गावर रॉंग साईडनं वाहने घेऊन जाणाऱ्या वाहनधारकांना थांबवित त्यांना वाहतूकीचे धडे दिले. तर अनेकांना वाहतूक पोलिसांच्या मार्फत दंड ठोठावला. दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून तब्बल 30 हजार रुपयांवरून जास्त दंड आकरला आहे. तर मिटकरी हे रस्त्यावर वाहनधारकांना समज देत असतानाच काही अल्पवयीन मूलही रस्त्यावर दुचाकी चालवत असल्याचे दिसून आले. त्यानंतर मिटकरींनीं थेट अल्पवयीन मुलांच्या पालकांना बोलवत त्यांना समज दिल्याचेही पाहायला मिळाले. सोबतच दंड आकारला. यादरम्यान, वाहतूक पोलिसांवर मिटकरींनी ताशेरे ओढले आहे.