रिक्त पदांचा प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत MPSCला पाठवा, अजित पवारांचे सर्व विभागांना निर्देश
शासनाच्या विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 15 ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक 4 मे 2021 आणि दिनांक 24 जून 2021 च्या शासन निर्णयातून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 15 ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. दिनांक 4 मे 2021 आणि दिनांक 24 जून 2021 च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते.