अजितदादांनी सदाभाऊ खोतांना झापलं, वादग्रस्त वक्तव्यानंतर म्हणाले, 'निषेधच नाही तर मी त्यांना फोन केला अन्...'

अजितदादांनी सदाभाऊ खोतांना झापलं, वादग्रस्त वक्तव्यानंतर म्हणाले, ‘निषेधच नाही तर मी त्यांना फोन केला अन्…’

| Updated on: Nov 07, 2024 | 11:47 AM

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या आजाराबद्दल काल एक वादग्रस्त वक्तव्य केले. ‘महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?’ असं सदाभाऊ खोत म्हणाले. यानंतर शरद पवारांचे कार्यकर्ते नेते आक्रमक झालेत. अशातच अजित पवारांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘सदाभाऊ खोत यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. मी काल तीव्र शब्दात निषेध केला. मी एवढ्यावरच थांबलो नाही. मी त्यांना फोन केला, त्यांना म्हटलं तुम्ही जे स्टेटमेंट केलं, ते आम्हाला कोणाला आवडलेलं नाही. कोणाविषयी व्यक्तीगत कोणाबद्दल बोलणं ही आपली पद्धत नाही. त्याबद्दलचा निषेध केला आहे’, असे अजित पवार म्हणाले. “खरंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुस्कृंत राजकारण कसं करायचं असतं हे दाखवलं. विरोधकांबद्दल बोलताना पातळी कशी सोडायची नसते. कमरेखालची वार कसे करायची नसते. आरोप-प्रत्यारोप होत असतात, पण ते मांडण्याची एक पद्धत असते. हे सगळं त्यांनी आपल्याला शिकवलं. हीच पद्धत पुढे वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, पवारसाहेब, विलासराव देशमुख यांनी पुढे चालू ठेवली. पण काल जे वक्तव्य केलं ते निषेधार्ह आहे.”असं अजित पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले, पवार साहेबांबद्दल पुन्हा असं घडता कामा नये. इथून पुढे महाराष्ट्रात अनेक नेते मंडळी येतील, राजकीय वक्ते येतील, राष्ट्रीय नेते येतील. असं कोणाबद्दल बोलू नये. तुम्हाला काय भूमिका मांडायची ती मांडा, तुमची आणि इतरांची विचारधारा वेगळी असू शकते. मतमतांतर असू शकतात. पण ते मांडताना ताळमेळ असला पाहिजे. हा निंदनीय प्रकार असून विनाशकाले विपरीत बुद्धी असा प्रकार आहे.

Published on: Nov 07, 2024 11:47 AM