‘ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?’, भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. सत्ताधाऱ्यासंह विरोधकांनी देखील विधानसभेत दणदणीत विजय मिळवण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. अशातच विरोधक लाडकी बहीण योजनेवरून सरकारची एकप्रकारे टीका करून बदनामी करतायत. यावरूनच अजित पवार यांनी विरोधकांना फटकारलं आहे.
पगार होणार नसल्याचे विरोधकांचे बगलबच्चे बोलतायंत, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलंय. सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना अजित पवार यांनी दम भरल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी अजित पवार बोलत असताना त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. ‘इतके दिवस विरोधक सरकारच्या योजनांवर टीका करताय, आता विरोधकांचे बगलबच्चे सांगताय, आता पगारच होणार नाही, आता सरकारकडे पैसेच शिल्लक राहिले नाहीत. हे शहाण्या सांगणाऱ्या… तू अर्थमंत्री आहे की मी अर्थमंत्री आहे?’, असं म्हणत अजित पवार यांनी सरकारची बदनामी करणाऱ्या विरोधकांना चांगलच फटकारत दम भरला आहे. पुढे ते असेही म्हणाले, अर्थमंत्री कोण आहे? तिजोरी तुझ्या हातात आहे की माझ्या हातात आहे? का लोकांना खोटं बोलतो. जनतेच्या समोर जायला यांना चेहरा नाही, म्हणून लोकांना खोटं सांगतात, लोकसभेच्या वेळी जशी जनतेची दिशाभूल केली तशी आताही करतायत, असं अजित पवार यांनी म्हटले.