मिरवणारे बाजूला व्हा, काम करणारे पुढे या, फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना अजितदादांचे खडे बोल
बारामतीत अजित पवारांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना टोला लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता संबंधितांना जागेवर खडसावणं ही अजित पवारांची पद्धत अनेकदा पहायला मिळालीय. आजही बारामतीत अजित पवारांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना टोला लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठवड्यातून एक दिवस बारामतीत येत असतात. या दरम्यान, विकासकामांची पाहणी, कोरोना आढावा बैठक असा त्यांचा दिनक्रम असतो. त्याचबरोबर कोरोना आणि नुकत्याच झालेल्या पूरग्रस्त मदत आणि साहित्याचं वाटप अजित पवार यांच्या हस्ते होत असतं. आजही विद्या प्रतिष्ठान संकुलाच्या परिसरात विविध संस्थांच्या वतीने आयोजित समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी अजित पवार यांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.