‘ठाण्याचा पठ्ठ्या साहेबांशी निष्ठावान…’, जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी अन् अजित पवार यांना टोला
VIDEO | जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करत अजित पवार यांना टोला, कुठे झळकले बॅनर्स आणि नेमका काय साधला अजित दादांवर निशाणा
ठाणे, ५ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा ५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असून यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण ठाणे शहरात शुभेच्छांचे बॅनर लावत एकप्रकारे पक्षाची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे . या बॅनरद्वारे अजित पवार यांना टोला लगावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्याचा पठठ्या साहेबांशी निष्ठावान आहे, होता आणि मरेस्तोवर राहणार अशा आशयाची बॅनरबाजी ठाणे स्टेशन परिसरात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन गट पडल्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यानंतर अजित दादा गटातील राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती व त्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकाने पूर्ण शहरभर बॅनर लावत त्या बॅनरवर जितेंद्र आव्हाड यांचा निष्ठावंत लोकनायक असा उल्लेख करत विरोधकांसह अजितदादा गटातील कार्यकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे