Akola CCTV : हा भामटा कुठे दिसल्यास तडक अकोला पोलिसांना कळवा! चोराची हातचलाखी कॅमेऱ्यात कैद
रुग्णांच्या मदतीसाठी दिवसभर धावपळ केल्यानंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांना गाढ झोप लागते. जेव्हा रुग्णांचे नातेवाईक गाढ झोपेत असतात तेव्हा हा भामटा येऊन त्यांच्या महागड्या मोबाईलवर हात साफ करतो.
अकोला : अकोला (Akola News) शहरातल्या जिल्हा स्त्री रूग्णालयात फोन व वस्तू चोरणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झालाय. अकोला पोलीस (Akola Crime) या चोराच्या शोधात आहेत. जिल्हा स्त्री रूग्णालयातील नातेवाईकांचे फोन चोरण्याचा सपाटाच या भामट्याने लावलाय. रुग्णालय सरकारी असो की खाजगी, हा चोर नातेवाईकांचे फोन, पाकीट व इतर वस्तू चोरतोय. ही दृश्य आहेत जिल्हा रुग्णालयातील. या रुग्णालयात रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्या सोबत आलेले नातेवाईक बाहेर निवांत झोपतात. रुग्णांच्या मदतीसाठी दिवसभर धावपळ केल्यानंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांना गाढ झोप लागते. जेव्हा रुग्णांचे नातेवाईक गाढ झोपेत असतात तेव्हा हा भामटा येऊन त्यांच्या महागड्या मोबाईलवर हात साफ करतो. रुग्णांचे नातेवाईक झोपले असले तरी सीसीटीव्हीनं आपलं काम चोख केलंय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भामटा कैद झालाय. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण नातेवाईकांचे अनेक मोबाईल जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेलेत. या चोरट्याने केवळ सरकारी रुग्णालयातच डल्ला मारला नाही तरी खाजगी रुग्णालयांमध्येही चोऱ्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याविषयी एका नातेवाईकाने पोलिस स्टेशनलाही तक्रार दाखल केलीय. तर रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरणाऱ्या भुरट्या चोराचा शोध पोलीस घेतायत.