Mohit Kamboj | आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड सुनील पाटील, मोहित कंबोज यांचे आरोप
सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र ऋषिकेश देशमुख यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांशीही सुनील पाटीलचे जवळचे संबंध आहेत, असा दावा भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी केला.
मुंबई: आर्यन खानसह क्रुझवरील अन्य लोकांना अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) जाळ्यात अडकवण्यात सुनील पाटील या व्यक्तीने मास्टरमाईंडची भूमिका पार पाडली आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र ऋषिकेश देशमुख यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांशीही सुनील पाटीलचे जवळचे संबंध आहेत, असा दावा भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी केला. ते शनिवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. आर्यन खान प्रकरणात याच सुनील पाटीलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 1 ऑक्टोबरला सॅम डिसोझाला फोन केला होता. मुंबईत क्रुझ पार्टी होणार असून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या 27 लोकांची माहिती माझ्याकडे असल्याचे सुनील पाटीलने सॅम डिसोझाला सांगितले. तसेच मला एनसीबीच्या अधिकाऱ्याशी बोलायचे आहे, असेही सुनील पाटीलने सांगितले. देशाच्या भल्याचे काम करण्याच्या हेतूने सॅम डिसोझाने सुनील पाटीलचा एनसीबीचे अधिकारी व्ही.व्ही. सिंग यांच्याशी संपर्क साधून देण्याचे मान्य केले.