महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? निकालानंतर फैसला, काय म्हणाले अमित शाह अन् शरद पवार?
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला विधानसभा निवडणुकीनंतर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध झाला आहे. यावेळी अमित शाह यांनी महाविकास आघाडीवरून उद्धव ठाकरेंना चार सवाल केलेत.
महाराष्ट्रात महायुती सरकारचं नेतृत्व सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताय. तर विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल? याचा फैसला तिनही पक्ष करणार असल्याचं विधान अमित शाह यांनी केलंय. काही दिवसांपूर्वी शिराळ्यातील सभेत अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपदाकरता देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत संकेत दिल्याची चर्चा रंगली होती. यावेळी राज्यात महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांना जिंकून आणण्याचं आव्हान त्यांनी केलं होतं. मात्र आता अमित शाहांनीच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे शरद पवारांनी सुद्धा महाविकास आघाडीत ज्यांचे जास्त आमदार असतील त्याच्या प्रतिनिधीला मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असं म्हटलंय. याआधीपर्यंत निवडणुकीपूर्वीच मविआने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा, यासाठी उद्धव ठाकरे हे आग्रही होते. एका मुलाखतीत पवार म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्व घटकपक्ष एकत्र बसू ज्यांचे जास्त आमदार त्या पक्षाला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देऊ’