Pune | बाबासाहेबांना अपमानित करण्याची संधी काँग्रेसने सोडली नाही, शाहांचा काँग्रेसवर निशाणा
बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचं काम काँग्रेसने सातत्याने केलं. गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना भारत रत्न देण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही.
पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान लिहून या देशाला आकार दिला. त्यांनी देशाच्या विकासात मोठं योगदान दिलं. मात्र काँग्रेसने त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांचा सातत्याने अपमान केला, अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि केंद्रीय सहकारीता मंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर केली. अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते पुण्यात होते. शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचं काम काँग्रेसने सातत्याने केलं. गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना भारत रत्न देण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही. देशातील जनतेला बाबासाहेबांचे काम आणि त्यांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा आम्ही संविधान दिवस साजरा केला. त्या त्यावेळी काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला, असा हल्ला शहा यांनी काँग्रेसवर चढवला.