‘…तर Amol Kolhe गांधीविरोधक ठरत नाहीत, शरद पवारांकडून कोल्हे यांची पाठराखण
गांधी सिनेमातही कुणी तरी गोडसेची भूमिका साकारली होती. पण भूमिका करणारा व्यक्ती कलावंत होता. तो गोडसे नव्हता. कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे, असं मत शरद पवार यांनी मांडलं.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे वादंग उठलं आहे. भाजपनेही यावरून अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. भाजपच्या या टीकेची राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले?, असा बोचरा सवाल शरद पवार यांनी केला आहे.
गांधी सिनेमातही कुणी तरी गोडसेची भूमिका साकारली होती. पण भूमिका करणारा व्यक्ती कलावंत होता. तो गोडसे नव्हता. कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि औरंगजेब संघर्ष झाला. शिवाजी महाराजांच्या सिनेमात जर कुणी शिवाजी महाराजांची भूमिका करत असेल आणि कुणी औरंगजेबाची भूमिका करत असेल तर औरंगजेबाची भूमिका करतो म्हणून तो मोगल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. तो कलावंत म्हणून भूमिका करत असतो. किंवा रामराज्यातील सिनेमा असेल तर राम रावणाचा संघर्ष असेल रावणाची भूमिका करणारा व्यक्ती रावण असू शकत नाही. तो कलाकार असतो. सीतेचं अपहरण दाखवलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होत नाही. रावणाचा तो इतिहास या माध्यमातून दाखवला जातो, असं पवार म्हणाले.