मातोश्रीवरून मला खोका मिळाला, खोक्यात काय, अमोल मिटकरीचं वक्तव्य वाचलंत?
मातोश्रीवरून मला एक खोका मिळालाय. पण हा गोडवा वाढवणारा खोका आहे, असं उपरोधिक वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलंय.
मुंबईः मला आज मातोश्रीवर खोका (Khoke) मिळाला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक खोका दिला. त्यात त्यांनी मला एक चॉकलेट दिलंय, असं उपरोधिक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलंय. मिटकरी यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मातोश्रीवरून मला एक खोका मिळालाय. पण हा गोडवा वाढवणारा खोका आहे. ज्यांनी खोके घेतले आहेत, त्यांनी उघडपणे सांगावं, असा टोमणाही मिटकरी यांनी लागवला.
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेला पुन्हा दहा हत्तींचं बळ मिळाल्याचं बोललं जातंय. यावरून मिटकरी यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, संजय राऊत लांब तोफ आहे. ती शिवसेनेची मुलुख तोफ आहे. 102 दिवस जेल यातना भोगल्यावर ती तोफ आता धडाडेल…
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी आज शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार यांच्या ताब्यात जो येतो, त्याला ते संपवतात. त्यांनीच शिवसेनेची अशी स्थिती केली. उद्धव ठाकरेंवर जादूटोणा करणारे तेच आहेत, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय.
त्यावर अमोल मिटकरी यांनी सडेतोड उत्तर दिलं. ते म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर पवार साहेबांचं नाव घेऊन हे सगळे पुढे जात आहेत. ज्या पद्धतीने अब्दुल सत्तार यांची पळता भुई थोडी केली, तशीच हालत आम्ही बावनकुळे यांची करू.
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेण्याची विनंती आम्ही राज्यपालांकडे केली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे. आता राज्यपाल काय भूमिका घेतात, हे पहायचं आहे. शिंदे सरकार अशा वृत्तीला खतपाणी घालत आहे, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय.
महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. भोंदूबाबा दाढी वाढवत असतात. अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. बावनकुळेंची हे समजून घेण्याची पात्रता नाही. भाजपाला विषारी वातावरण निर्मिती करायची आहे. मात्र या वक्तव्यावर बावनकुळे यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी मांडली.