Ladki Bahin Yojana : … तर तुमच्या खात्यातून 1500 रूपये काढून घेणार? सरकारमधील नेत्यानं असं काय म्हटलं, की महिलांमध्ये सुरू झाली चर्चा
आशीर्वाद दिला नाहीतर खात्यातून १५०० रूपये परत घेणार, असं वक्तव्य अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलं आहे. अमरावतीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात रवी राणांनी हे वक्तव्य केले आहे. बघा नेमकं काय म्हणाले रवी राणा?
सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या दुसऱ्या दिवसापासून महिलांमध्ये या योजनेचीच चर्चा पाहायला मिळतेय. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची सरकारी कार्यालयात एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असताना महिलांची कागदपत्र जमवण्यासाठी धावाधाव सुरू आहे. दरम्यान, येत्या १७ ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पहिला हप्ता मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी दोन महिन्याचे ३००० रुपये पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी स्वतः महिलांना दिली आहे. अशातच आज अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी या योजनेसंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. दिवाळीनंतर या महिलांना १५०० रूपयांच्या जागी ३ हजार रूपये देण्यात यावे, असे मी मागणी करेन… तुमचा भाऊ म्हणून मी सरकारला विनंती करेन की १५०० रूपयांच्या जागी ३ हजार रूपये बहिणांना देण्यात यावे. पण हे कधी म्हणता येईल, जेव्हा तुम्ही त्यांना भरभरून आशीर्वाद द्याल. ज्यांनी आशीर्वाद दिले नाही. मी तुमचा भाऊ आहे, ते पैसे तुमच्या खात्यातून परत घेईन, असं मिश्किल वक्तव्यही यावेळी रवी राणांनी केलं.