‘राऊत अन् वडेट्टीवार एकदम बेशरम निर्लज्ज, त्यांनी लोकांच्या…’, विरोधकांच्या टीकेवरून राणांचा पलटवार
निवडणुकीमध्ये आशीर्वाद न दिल्याने लाडक्या बहिणींच्या खात्यातून १५०० रूपये काढून घेणार असं मिश्किल वक्तव्य अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी अमरावतीमध्ये केलं होतं. यानंतर विरोधकांनी रवी राणांवर चांगलाच निशाणा साधला आहे. दरम्यान, सातत्याने होत असलेल्या टीकेवर राणांनी प्रत्युत्तर दिलंय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांचा सरकारवर आणि राणांवर एकच हल्लाबोल पाहायला मिळतोय. यावरच रवी राणांनी पलटवार केलाय. मी जे बोललो ते संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी नीट एकलं नसेल. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी कोणत्याही योजना सुरू केल्या नाहीत. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या योजना बंद करण्याचं काम यांनी केलं, असे म्हणत रवी राणांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांना चांगलंच फटकारलं. तर पुढे ते असेही म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पुढे आलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होईल आणि महायुती सरकार आलं तर १५०० रूपयांऐवजी ते ३ हजार रूपये लाडक्या बहिणांना देतील, असं माझं वक्तव्य होतं. तर संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांना ऐवढंच सांगायचं आहे, तुम्ही खोटं बोलून महिलांना साडेआठ हजार देण्याची घोषणा केली होती आणि मतं घेतली. तुम्ही एकदम बेशरम निर्लज्ज झाले आहात, गरिब लोकांच्या तोंडाला तुम्ही पाने पुसले आहेत, असं म्हणत रवी राणांनी हल्लाबोल केला आहे.