आरोपासाठी आरोप नको, महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं
'खंत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांनी त्यांच्या मुलासाठी काम केलेलं नाही. कुठल्याही वडिलांना असं वाटणं सहाजिक आहे. माझ्या घरात, माझा मुलगा असणं यात जगावेगळी गोष्ट आहे का? पुराव्यानिशी बोलावं, आरोपासाठी आरोप नको. महायुतीमध्ये आहोत, याची जाणीव ठेवा', आनंदराव अडसुळांचा हल्लाबोल
महायुतीतला उमेदवार निवडून आणणं, हे महायुतीमधल्या सर्व पक्षांच काम आहे. गजानन किर्तीकर यांचं विधान, त्यांची भूमिका महायुतीच्या युती धर्माला छेद देणारी आहे, आम्ही याचा निषेध करतो, असं वक्तव्य करत शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलारांनी टीका केली आहे. आशिष शेलारांनी केलेल्या टीकेवर शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी पलटवार केलाय. शेलारांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना आनंदराव अडसूळ यांच्याकडून गजानन कीर्तिकर यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. शेलारांच्या टीकेवर पलटवार करताना अडसूळ म्हणाले, गजानन किर्तीकर काय म्हणाले, की मी माझ्या मुलासाठी काम करू शकलो नाही, याची माझ्या मनामध्ये खंत आहे. खंत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांनी त्यांच्या मुलासाठी काम केलेलं नाही. कुठल्याही वडिलांना असं वाटणं सहाजिक आहे. माझ्या घरात, माझा मुलगा असणं यात जगावेगळी गोष्ट आहे का? पुराव्यानिशी बोलावं, आरोपासाठी आरोप नको. महायुतीमध्ये आहोत, याची जाणीव ठेवा, असेही आनंदराव अडसूळ म्हणाले.