माहिममध्ये तिहेरी लढत, कोण मारणार बाजी? मनसे-शिंदे सेना अन् ठाकरे गटाच्या शिलेदारांमध्ये बिग फाईट
अमित ठाकरेंच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. मात्र लोकसभेला राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने महायुती अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार नाही असं बोललं जात होतं. मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकरांनाच मैदानात उतरवलंय. त्यामुळे आता लढत चुरशीची होणार आहे.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे हे मनसेचे उमेदवार आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही आपला उमेदवार अमित ठाकरे यांच्या विरोधात दिला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या मदतीची परफेड अमित ठाकरेंच्या वेळी होताना दिसत नाहीये. आदित्य ठाकरेनंतर आता अमित ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील आणखी एक शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसणार आहे. मनसे या पक्षाकडून अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरेंचं नाव मनसेकडून घोषित होताच शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट जाहीर करण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुख महेश सावंत यांची त्याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. माहिमच्या मतदारसंघात आता शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर, मनसेकडून अमित ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांच्यात बिग फाईट होताना दिसणार आहे. उमेदवारी जाहीर होताना विजयाचा विश्वास व्यक्त करताना अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.