माहीम मतदारसंघात यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे सेना अन् ठाकरे गटाच्या शिलेदारांमध्ये तिरंगी लढत
मुंबईतील माहीम या मतदारसंघात बिग फाईट होणार असल्याची चर्चा रंगत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंतर आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील माहीम विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार देणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक 2024 साठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी रात्री जाहीर केली. यामध्ये माहीम मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे अध्यक्ष यांचे पूत्र अमित ठाकरे यांना पहिल्यांदाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना विधानसभेसाठी पक्षाकडून तिकीट देण्यात आलं आहे. तीन टर्मचे आमदार, नगरसेवक ते आमदार असा प्रवास करत कमावलेला दांडगा जनसंपर्क सदा सरवणकर यांच्याकडे आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. नुकतीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकरांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे माहीमची निवडणूक ही लक्षवेधी असणार आहे. यासोबत ठाकरे गटाकडून देखील याच मतदारसंघासाठी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता तिहेरी सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.