भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत आमित शाह आणि जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची एक बैठक पार पडली ज्यामध्ये विद्यमान आमदारांना सरसकट तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही समजतंय.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्यात. दिल्लीत आमित शाह आणि जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील १२ भाजप नेत्यांची बैठक झाली. ज्यात भाजपच्या सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही, असे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही. ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांनाच तिकीट देण्यात येणार आहे. ज्या आमदारांची कामगिरी कमी असेल त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये सध्याचे मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांच्या नावांचा समावेश असणार आहे. दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्व विधानसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाली. यावेळी तयारीचा आढावाही घेण्यात आला. उमेदवारांच्या नावाची प्राथमिक छाननी झाली. दरम्यान, बुधवारी आचारसंहिता आणि निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बुधवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. या बैठकीनंतर पहिली यादी समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.