तुमची भांडणं घरी ठेवा, मंत्र्याने चॅलेंज दिलं तिथं जाणार अन् शेतकऱ्यांचं काय? आदित्य ठाकरेंना कुणाचा सवाल?
तुमच्या शिवसेनेत वाद होतायत, पण तुम्ही लोकांना का वेठीस धरताय? असा सवाल दोन्ही गटातील शिवसेनेला करण्यात आलाय.
औरंगाबादः तुमची भांडणं घरात ठेवा. शिवसेनेतल्या भांडणामुळे राज्यभरात (Maharashtra politics) केवळ आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नेते मंडळी दौरे आयोजित करतायत, पण ते फक्त एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, शक्तिप्रदर्शन करण्यासाठी… या भांडणात सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे कोण पाहणार, असा सवाल मनसे नेत्याने केलाय. औरंगाबाद मनसेचे (MNS) जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर (Sumit Khambekar) यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय.
सिल्लोडचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी आव्हान दिलंय. तुम्ही वरळीतून राजीनामा द्या. मराठवाड्यातून सिल्लोडमधून निवडून दाखवा, अब्दुल सत्तार यांच्या आव्हानानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांच्या मतदार संघात दौरे आयोजित केले आहेत.
औरंगाबादच्या अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड तर संदीपान भूमरे यांच्या पैठण मतदार संघातही हे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. यावरून औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आदित्य ठाकरेंना सवाल केलाय.
सुमित खांबेकर म्हणाले, ‘ एखादा मंत्री तुम्हाला चॅलेंज देत असेल तिथे जाता. पण इथल्या अनेक तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ पडलाय, तिथे जात नाहीत. तुमच्या शिवसेनेत वाद होतायत, पण तुम्ही लोकांना का वेठीस धरताय?
अतिवृष्टी ग्रस्तांना मदत होतच नाहीये. संभाजीनगरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. तुम्ही जर मंत्र्यांच्या चॅलेंजसाठी येत आहात.. तुमच्या भांडणात जनतेचं नुकसान होतंय…
पाहा मनसे नेत्याने काय म्हटलंय?
आपापसातली भांडणं घरी ठेवा. इथे 9 तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. तिथे न जाता एकमेकांना खाली दाखवण्यासाठी जे प्रयत्न करतायत, ते चुकीचं आहे, असं वक्तव्य सुमित खांबेकर यांनी केलंय.