चुकीला माफी नाफी! बागेश्वर बाबांना वारकरी संघटनेचा इशारा
बागेश्वर बाबा यांनी उधळलेल्या मुक्ताफळानंतर महाराष्ट्रातून तीव्र संताप, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधानाचा निषेध
आपल्या चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आलेले बागेश्वर बाबा आता नव्या कोंडीत सापडले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबा यांनी उधळली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशातच बागेश्वर महाराजांच्या चुकीला माफी नाही. बागेश्वर महाराजांचे कार्यक्रम महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा आझाद हिंद वारकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.
या प्रकरणी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर बाबांनी नव्या वादाला फोडणी दिल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे, असे विधान बागेश्वर बाबांंनी केले.त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर आक्षेप घेतला जात आहे.