Baba Siddique Funeral : बाबा सिद्दिकींची भर पावसात अंत्ययात्रा, झिशानच्या डोळ्यात अश्रू, दुःख अनावर
बाबा सिद्दीकी यांच्या वांद्रे येथील राहत्या घराहून मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान अशी बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. भर पाऊस कोसळत होता. अशातच बाबा सिद्दिकींना झिशानसह कुटुंबीयांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी झिशान यांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. वडिलांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन आरोपींनी गोळ्या झाडून हल्ला केला. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर समजताच त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांचं निधन झालं. ही घटना शनिवारी रात्री सव्वा ९ साडे नऊ वाजेदरम्यान, मुंबईतल्या वांद्रेमधील खेरवाडी परिसरात बाबा सिद्धीकी यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्धीकीच्या कार्यालयाजवळ घडला. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर मुंबई महापालिकेच्या कुपर हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करण्यात आलं. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव घराबाहेर आणण्यात आलं. यावेळी नमाज ए जनाजाचं पठण करण्यात आलं. नमाज ए जनाजा अदा केल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या अत्यंयात्रेला सुरुवात झाली. यावेळी मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांना सलामी दिली. बाबा सिद्दीकी यांच्या वांद्रे येथील राहत्या घराहून मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान अशी बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. नमाज ए जनाजाचं पठण करण्यात आल्यानंतर बडा कब्रस्तान येथे मुस्लिम धर्मानुसार त्यांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले.