बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली; मुंबई क्राईम ब्रांचकडून कसून चौकशी
बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. बाबा सिद्दीकी हे त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयाजवळ असताना त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणातील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर तिसऱ्याची ओळख पटली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, मुंबई क्राईम ब्रांच यूनिट ३ मध्ये आरोपींची चौकशी सुरू आहे. दोन आरोपींना पकडून स्थानिकांनीच पोलिसांच्या हवाली केलं. तर बाबा सिद्दीकींची पाळत ठेवून हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करनौल सिंह आणि धर्मराज कश्यम या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून करनौल सिंह हा हरियाणाचा तर धर्मराज कश्यम हा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख पटली असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या सगळ्या आरोपींचा क्रिमिनल रेकॉर्ड तपासला जात आहे. हरियाणाच्या आरोपीचा क्रिमिनल रेकॉर्ड असून मुंबई पोलीस हरियाणा पोलिसांकडून आरोपीची माहिती घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याने त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेची तीन ते चार पथकं राज्याबाहेर रवाना करण्यात आली आहे.