'संधी मिळताच दोघांवर...', बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट? चौकशीत आरोपींची मोठी कबुली

‘संधी मिळताच दोघांवर…’, बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट? चौकशीत आरोपींची मोठी कबुली

| Updated on: Oct 14, 2024 | 2:55 PM

बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेण्यात येतोय. अशातच आरोपींची कसून चौकशीही पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपींच्या चौकशीत मोठा खुलासा समोर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, शिवकुमार उर्फ शिव गौतम अशी गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. तर चौथा आरोपीचं नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा चौथा आरोपी हा तीनही आरोपींना हँडल करत होता. हे चारही आरोपी हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये एकत्र आले होते. त्याचवेळी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट शिजला असल्याची माहिती मिळतेय. हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये हे आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात आले. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर आरोपींनी प्रत्येकी 50 हजार रुपये वाटून घ्यायचे असल्याचे ठरवले होते, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून एक मोठा खुलासा समोर आला आहे. बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी या दोघांनाही मारण्याचे आदेश होते. आरोपीची चौकशी सुरू असताना आरोपींनी ही मोठी कबुली दिली आहे. ‘संधी मिळताच दोघांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते’, अशी कबुली आरोपींकडून देण्यात आली असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सुरू असलेल्या आरोपींच्या चौकशीतून समोर आलेल्या खुलासा नंतर एकच खळबळ उडाली आहे.

Published on: Oct 14, 2024 02:55 PM