Bacchu Kadu : विधानसभेच्या निकालाआधीच बच्चू कडूंचा सत्तास्थापनेबद्दल मोठा दावा, ‘आमच्याशिवाय सत्ता स्थापन….’
“प्रहार जनशक्ती पक्षाचे १५ आमदार निवडून येणार आहे. त्यासोबतच अनेक अपक्ष आमदारांच्याही आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही”, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील एक्झिट पोल समोर आले आहे. यातील टीव्ही 9 रिपोर्टरच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला 129 ते 139 जागा तर महाविकास आघाडीला 136-145 जागा मिळण्याची शक्यता आहे. यासोबत इतर आणि अपक्ष यांना 13 ते 23 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात मोठं वक्तव्य करत एक मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. पुढे ते असेही म्हणाले, माझ्या मतदारसंघात भाजपने अतिशय खालच्या पातळीवर राजकारण केले आहे. काँग्रेस आणि भाजप हे संभ्रमात आहे. त्यांच्या डोक्यात फक्त बच्चू कडूला पाडणं हाच विचार होता. मात्र माझा विजय हा निश्चित होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात आम्हीच सत्ता स्थापन करणार आहे, हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. आम्ही सत्ता स्थापन करु आणि एखाद्या मोठया पक्षाला आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. आमच्या शिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही”, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हा विश्वास व्यक्त करत मोठा दावा केलाय.