जरांगे पाटलांवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार कोणाला फायदा? ‘त्या’ निर्णयावर बच्चू कडू स्पष्टच म्हणाले…
माघार घेताना जरांगे जे बोलले आहे, की एका जातीवर राजकारण होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर्व राजकीय पक्ष धर्म आणि जातीवर निवडणूक लढवत आहे. त्यासोबत पैशाची ताकद असते. हे समीकरण मोठ्या पक्षांनी सुरू केले आहे. त्यामुळे जरांगे जे बोलले ते योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. यावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘केलेलं काम समोर ठेवून निवडणूक लढवली पाहिजे. मात्र सर्व राजकीय पक्षांनी राजकारणाची व्याख्या बदलून टाकली आहे. बच्चू कडू चार वेळेला निवडून आला, कारण लोकांनी निवडून दिलं. पक्षांची झुंडशाही मी माझ्या मतदारसंघातून संपवली, तेच महाराष्ट्रात करू’, असेही बच्चू कडू म्हणाले. एका जातीच्या आधारावर राजकारण होत नाही हे मनोज जरांगेना आधी समजावून सांगितलं नव्हतं का? असा सवाल केला असता बच्चू कडू म्हणाले, मी कोणाचा राजकीय गुरू नाही. त्यामुळे समजून सांगायची गरज नाही आणि जरांगे तसे हुशार आहे. मातीवरच्या जमिनीवरच्या माणसाला समजावून सांगायची गरज पडत नाही. मोठ्या नेत्यांना समजावून सांगणारे पंधरा-वीस लोकं असतात. मात्र बच्चू कडू आणि इतर जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना समजावण्याची गरज पडत नाही. तर पाहता मला वाटत नाही जरांगे दबावला बळी पडणारा माणूस आहे. मनोज जरांगेच्या माघारीमुळे फायदा कोणाला होईल याचा कुठलाही मोजमाप यंत्र नाही. मात्र ग्राऊंडवरची राजकीय परिस्थिती वेगळी असते, असेही बच्चू कडू म्हणाले.