भाजपने मित्र बनून मुख्यमंत्री शिंदे यांच्या मानेवर सुरी ठेवली; बच्चू कडू असं का म्हणाले?
प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या तिसऱ्या आघाडीची निर्मिती होताच बच्चू कडू सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. मात्र, बच्चू कडू यांनी सर्वाधिक टार्गेट भाजपला केलं आहे. भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फसवणूक केल्याचा आरोपच बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आता अद्दल घडली. शिंदे गटाचे चार खासदार पडले ते केवळ भाजपच्या हस्तक्षेपामुळे. भाजपने हस्तक्षेप केला नसता तर शिंदे गटाचे किमान चार खासदार वाढले असते. हे नुकसान कुणी केलं? म्हणजे भाजपने मित्र बनून एकनाथ शिंदे यांच्या मानेवर सुरी ठेवण्याचं काम व्यवस्थित केलं आहे, असा आरोप प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी हा आरोप केला आहे. राज्यात नव्याने निर्माण झालेल्या महाशक्ती आघाडीवर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याचाही बच्चू कडू यांनी समाचार घेतला. संजय राऊत यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं पीआर कार्ड नाही. संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे. त्यांची जहांगीरदारी नाही, असं बच्चू कडू म्हणाले. आम्ही महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबुतीने देऊ. आम्हाला कोणाला पाठिंबा देण्याची गरज पडणार नाही. महाशक्तीचा राज्यात मुख्यमंत्री दिसेल, असा दावा करतानाच आमची महाशक्ती संपूर्ण देशात आदर्श ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देऊ आणि 288 जागा आम्ही पूर्ण ताकजदीने लढवू, असंही त्यांनी जाहीर केलं.