‘त्यांना’ पायाखाली तुडवा, माझ्या आदेशाची वाट पाहू नका; बाळासाहेबांच्या विचारांच्या या बॅनरची होतेय चर्चा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील एका बॅनरची चांगलीच होतेय चर्चा, कुठे लावलंय बॅनर आणि का होतेय चर्चा?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त विधानभवनात तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तर काही ठिकाणी लोकाभिमुख उपक्रम देखील घेण्यात आले. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणारे पोस्टर्स, बॅनर्स देखील शिवसैनिकांनी लावले होते. मात्र एका बॅनरची चांगलीच चर्चा होताना दिसतेय.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुंबईतील मानखुर्द येथे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणारे बॅनर लावण्यात आले होते. पण या बॅनरवर लिहिलेल्या वाक्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ‘पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवा, माझ्या आदेशाची वाट पाहू नका’, असे बाळासाहेबांचे वाक्य यावर दिसत आहे. हे बॅनर मानखुर्द विधानसभा यांच्याकडून लावण्यात आले आहे. अशाच प्रकारचे होर्डींग आणि बॅनर मुंबईतील काही भागात लावण्यात आल्याचे देखील बघायला मिळाले.