अवकाळी पावसानं हाहाकार, शेताचं तळं तर रस्त्यावर साचलं गुडघाभर पाणी
VIDEO | बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांची पीकं उद्धवस्त तर रस्त्यात साचलं पाणीच पाणी
बीड : बीड शहरासह जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. दुपारी उकड्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसात वीज कोसळून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. दरम्यान मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल झालेल्या पावसाने बीड शहरात अक्षरशः हाहाकार माजला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिषद प्रशासनाकडून नाले सफाई झाली नसल्याने पावसाच्या पाण्याने रस्त्यावर पाणी साचले होते. बीडच्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले असून किरकोळ व्यापाऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. तर परळी तालुक्यातही अवकाळी पावसाने तुफान बॅटिंग केलीय. अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने बीड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचा आवाहन केले होते. शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. परंतु शेतकऱ्यांच्या पिकाचं होत्याचं नव्हतं झालंय. वादळी वाऱ्यासह बीड जिल्ह्यात अवकाळीपावसानं नागरिकांची दैना उडाल्याचे पाहायला मिळत आहे.