BEST Strike | बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा 5 वा दिवस; संपामुळे वाहतुकीवर परिणाम, मुंबईकर हैराण
VIDEO | बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा 5 वा दिवस, सामान्य मुंबईकरांना मोठा फटका; संपकऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
मुंबई, ६ ऑगस्ट २०२३ | बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा 5 वा दिवस आहे. आज देखील मुंबई मधल्या हजारहून अधिक बेस्ट बसेस या रस्त्यावर धावत नसल्याने सामान्य मुंबईकरांना मोठा मनस्ताप होत आहे. बेस्टच्या थांब्यावर मुंबईकरांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. संपाची कोणतीही पूर्व सूचना किंवा नोटीस न देता सर्व कंत्राटी कर्मचारी संपावरती गेले असल्यामुळे या सर्व संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपन्यांकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. प्रशासनाकडून बेस्ट मार्गावर सर्व खाजगी वाहतूकदारांना टप्प्यात प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्या संदर्भातील एक परिपत्रक काल शासनाकडून काढण्यात आले आहे. आमच्या पगारात वाढ करण्यात यावी, या मुख्य मागणी करता सर्व बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केलेली आहे. मात्र हा आता संप कधी मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करा, बेस्ट प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी बेस्टचे सर्व बंद बसमार्ग पुन्हा सुरू करा, बस गाड्यांची देखभाल-दुरूस्ती करून बस मार्गस्थ करा आणि विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार वाढवा, अशा विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.