ज्यांना आमदार सांभाळता आले नाही, त्यांनी पंकजाताईंना ऑफर देऊ नये; चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल
संत वामन भाऊ यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर होत असलेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे या अनुपस्थित होत्या. यानंतर राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना भाजपकडून मोठी प्रतिक्रिया
संत वामन भाऊ यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर होत असलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. मात्र या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे या अनुपस्थित होत्या. यानंतर राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाकडून पंकजा मुंडे यांना देण्यात आलेल्या ऑफरवर बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहे. त्या कधीच जाऊ शकत नाही. ज्यांना आमदार, पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी पंकजा मुंडे यांचा विचार करू नये. पंकजा ताईंच्या वागण्या-बोलण्यात, चालण्यात, रक्तात भाजप आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल त्यांनी कोणतीही आफवा पसरवू नये. पंकजा मुंडेंना कोणीही फूस लावू शकत नाही, त्या एवढ्या प्रगल्भ नेत्या आहेत, असेही ते म्हणाले.