Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच दिल्लीत शिक्कामोर्तब
राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातच आता मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज संध्याकाळपर्यंत दिल्लीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला सर्वाधिक २३० जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीच्या पारड्यात केवळ ४६ जागां पडल्या. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. असे असताना ज्यांचे सर्वाधिक आमदार त्यांचा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असताना मुख्यमंत्रिपदाच्या २ फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चाही झाली. यातील पहिल्या फॉर्म्युलामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल. तर त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे असेल. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी २-२-१ अशा दुसऱ्या फॉर्म्युलावरही चर्चा सुरु आहे. या फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्षे, शिंदे गटाकडे दोन वर्षे आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. मात्र महायुतीत भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या असल्याने पुढील पाच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असावा आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी अनेक कार्यकर्ते आग्रही आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला राज्यात मोठं यश मिळालं आहे, अशी भावनाही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र आज संध्याकाळपर्यंत दिल्लीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे.