Chandrakant Patil | उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका
आघाडीत बिघाडी होऊन पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युती होईल, अशी आशा काहीजणांना वाटत असते. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता शिवसेनेसोबत युती नको, अशी स्पष्ट भूमिका आज अमरावतीत मांडलीय.
अमरावती : राज्याच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध भाजप हे चित्र अधिक गडद होताना दिसत आहे. आघाडीत बिघाडी होऊन पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युती होईल, अशी आशा काहीजणांना वाटत असते. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता शिवसेनेसोबत युती नको, अशी स्पष्ट भूमिका आज अमरावतीत मांडलीय. इतकंच नाही तर राज्याच्या राजकारणातील पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा म्हणून पाटील यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. “स्वबळावर सत्ता आणण्याची तयारी आपली चालली आहे. सत्ता येईल नक्की. यापुढे कुणी नको आपल्याला युतीमध्ये. काही प्रामाणिक पक्ष आपल्यासोबत आहेत. आरपीआय, रयत क्रांती संघटना, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम आपल्यासोबत आहेत. अजून काही छोटे-छोटे पक्ष आपल्यासोबत यायचं म्हणत आहेत. पण हे नाव मोठं आणि लक्षण खोटं आता नको. पाठीत खंजिर खुपसणारं एकच नाव महाराष्ट्राच्या राजकारणात होतं. पण आता पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा समोर येतो”, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवलाय. पाटील यांच्या या टीकेमुळं शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.