मनोज जरांगे पाटील शरद पवारांच्या नादी लागून भरकटले, भाजप नेत्याची सडकून टीका
मनोज जरांगे पाटील यांच्या बोलण्या, वागण्यामुळे इतर समाजाकडून जे समर्थन मिळत होते त्यापासून ते आता दुरावत चालले आहे, अजूनही वेळ गेलेली नाही... कपटी शक्तींच्या संमोहनातून बाहेर पडावं, असा सल्लाच भाजप नेते आमदार आमित साटम यांनी मनोज जरांगे पाटलांना दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांनी पुढाकार घेतला त्यावेळस एक सामान्य मराठा म्हणून खुप अभिमान वाटत होता. एका बाजूला शिवछत्रपतींच्या आदर्शांचे पालन करत होतात कारण छत्रपती जेव्हा युद्धावर जायचे त्यावेळेस ते सक्त ताकीद देत असत की सामान्य रयत कुठल्याही परिस्थिती भरडली नाही पाहिजे. पण आता असे वाटते की मनोज जरांगे पाटील शरद पवारांच्या नादी लागल्याने ते भरकटले आहेत, असा हल्लाबोल भाजप नेते आमदार अमित साटम यांनी केला. मनोज जरांगेंच्या बोलण्या, वागण्यामुळे इतर समाजाकडून जे समर्थन मिळत होते त्यापासून ते आता दुरावत चालले आहे, अजूनही वेळ गेलेली नाही… कपटी शक्तींच्या संमोहनातून बाहेर पडावं, असा सल्लाच साटम यांनी जरांगे पाटलांना दिलाय. सगे सोयरे राजकारणात पुढे आणेन, त्यांनाचं मोठे करणे हाच पवारांचा नेहमी सुप्त अध्यादेश राहिलेला आहे आणि जर मी चुकत असेल तर पवारांनी एखादा तरी गरीब मराठा कुटुंबातील मोठा केलेला मराठा दाखवावा, असं खोचकपणे आव्हानच साटम यांनी केलं.